२०१४ पूर्वी-

आठवतय का आपण फेसबुक अकाउंट कशासाठी उघडले होते ? मी तरी निव्वळ आनंदापोटी राज्यातील, देशातील आणि परदेशातील मित्रांसोबत स्वतःला जोडता यावे या शुद्ध हेतूने अकाउंट उघडले होते. स्वतःचे, कुटुंबाचे फोटोज, सोहळे, यश, प्रगती एकमेकांशी शेअर करता येतील हा साधा उद्देश होता. खूप मजा वाटायची दूरचा कुठलातरी मित्र एफबी वर भेटला की. मस्त गप्पा मारता यायच्या. भूतकाळातील आठवणीने मनसोक्त हसायचो.

पुढे याच फेसबुकचा वापर आपल्या क्षेत्रातील लोकांचा ग्रुप बनवून व्यवसायाकरता करण्याची सोय झाली आणि त्याचे फायदे सुधा प्राप्त झाले.

नंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रातील ग्रुप तयार झाले. कुणी कविता लिहिणारे, कुणी कविता सादर करणारे, कुणी लेखक, कुणी गायक, कुणी समाज सेवेतील, कुणी क्रीडाक्षेत्र, कुणी पर्यटक तर कुणी ट्रेकर्स असे अनेक ग्रुप्स तयार होऊन जास्तीत जास्तीत लोकांपर्यंत कनेक्ट होता आले.

फेसबुकचा सर्वात मोठा फायदा मला झाला तो म्हणजे माझे विचार मला जगासमोर माझ्या भाषेत मांडता आले. अनेक विषयावर लिहीता आले. भावना, वेदना,संवेदना, इच्छा,आकांक्षा, प्रेरणा या वयक्तिक भावविश्वात मस्त फेरफटका मारता आला. शिक्षणक्षेत्र, सामाजिक भान, राजकारण,क्रीडा,वन्यजीव, वनसंरक्षण अशा अनेकविध विषयांवर जसे जमेल तसे प्रकट होता आलं.

पण माहित नव्हतं हे प्रकट होणं पुढे जाऊन कोणाला त्रासदायक होईल. लिहिलेले न पटल्यास प्रतिक्रिया येत असे. परंतु विखारी, वयक्तिक हल्ले कधी होत नव्हते. दुसऱ्याच्या विचारांना एक स्वतंत्र विचार म्हणून पाहिले जात होते. आपले वेगळे विचार छान पद्धतीत मांडले जात होते. छान विधायक चर्चा झडायच्या.

माहित नाही पण मागे वळून पाहिले तर साधारण २०१४ नंतर हे चित्र बदलयं. तसा राजकारण हा विषय फेसबूकवरील मित्रांचा खूप कमी आवडीचा होता. आणि खूप कमी जण त्यावर मते मांडायची. पण आता प्रत्येक जण एक राजकीय विचारधारा घेवून जगतोय. आपली विचारधारा योग्य हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. कधी नव्हे ते राजकारण घराघरात पोहोचलय. ते इतके वाईट झालयं की, वयक्तिक, घरगुती संबंध विसरून आपल मत खरं ठरवण्यात जो तो गुंतलाय. दिवसभर शाब्दिक चिखलफेक करण्यात, अश्लील, अर्वाच्य प्रतिक्रिया देण्यात काहींना धन्यता वाटते. वयक्तिक धमक्या आणि शेरेबाजी याला उत आलाय.

खोटा इतिहास, फोटोशॉप इमेजेस, एडिटिंगच स्तोम माजलयं. एक ” IT Cell नावाच प्रति फेसबुक ” ही सर्व घाण करत आहे. ते एवढं भयंकर प्रमाणात वाढलय की नक्की खरं काय नि खोटं काय यातला फरक कळेनासा झालाय. सतत खोट वाचून-ऐकून कित्येक शिक्षित लोक त्या खोट्यालाच आता खरे मानू लागलेत. गांधी – सावरकर-आंबेडकर यांच्यावर दोन पुस्तकंसुद्धा न वाचलेले लोकं त्यांचे दाखले जणू त्याचं सर्व आयुष्य समजून चुकले आहेत या अविर्भावात IT Cell च्या खोट्या इनपुट द्वारे देत असतात. IT Cell च्या खोट्या शेखी मिरवण्यात जरापण विचार केला जात नाही की सामाजिक स्वास्थ्य कोणत्या थरापर्यंत बिघडलय. देशाची अर्थव्यवस्था पुरती कोलमडलेली असताना धर्म,जात, पंथ, हिंदुत्ववाद, इस्लाम खतरे में हे या बाबी सर्वात जास्त चघळल्या जात आहेत.

आज कोरोनाचे संकट देशाला उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे. परंतु या IT Cell च्या अपप्रचाराने राजकीय रंगपंचमी खेळली जात आहे.

कोणी लावले हे IT Cell चे विखारी झाड? कुणी संगोपन केले या झाडाचं? कुणी खतपाणी घातलं ? आणि कुणी त्याची कडवट फळं फेसबुकरूपी बाजारात विकायला आणली? मित्रानो शांत बसून २०१४ पूर्वीचे फेसबुक आणि आताचे फेसबूक यावर विचार केला तर उत्तर नक्की सापडेल.

या IT Cell च्या व्हायरसवर अँटी-डोस कधी मिळेल तेव्हा मिळेल पण या व्हायरसचा कमीत कमी संसर्ग आपल्या सर्वांना होवो याकरता दक्षता घेण्याची वयक्तिक जवाबदारी आपली आहे. आणि किमान महाराष्ट्र शासन तरी येणाऱ्या काळात ज्यांना संसर्ग झालाय त्यांना कॉरंटाईन करण्यात यशस्वी होईल आणि IT Cell नावाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव थांबेल ही भाबडी आशा आहे..

.. विनय खातू

Leave a comment